

कोल्हापूर, दि. २ नोव्हेंबर :
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांच्या वतीने आणि होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्ह्यात ‘बालस्नेही पोलीस स्टेशन’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात आला आहे. बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या समस्या व तक्रारींचे संवेदनशीलतेने निराकरण तसेच बालकांशी संबंधित विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या अनुषंगाने रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य श्री. अतुल देसाई, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल (IPS), विशेष बाल पोलीस पथकाच्या अध्यक्ष तथा पोलीस उपअधीक्षक श्रीमती पत्की, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. सुहास वाईंगडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. सागर दाते, होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कॅरोलिन, श्री. शकील शेख, ॲड. संजय सेंगर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र ‘बालस्नेही पोलीस कक्ष’ निर्माण करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष बाल पोलीस पथकाच्या सर्व अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचेही निश्चित करण्यात आले.
बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलिसांनी अधिक संवेदनशीलतेने व बालस्नेही दृष्टिकोनातून काम करणे, बालकांना पोलीस स्टेशनमध्ये सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण उपलब्ध करून देणे, तसेच बालकांशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया अधिक सुलभ व बालस्नेही बनविणे यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा बालस्नेही बनविण्यासाठी पोलीस विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल यांनी यावेळी दिली.
या उपक्रमामुळे बालकांच्या हक्कांचे संरक्षण अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून, बालकांना सुरक्षित वातावरण आणि न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन व बालकल्याणाशी संबंधित सर्व विभागांमध्ये अधिक चांगला समन्वय निर्माण होण्यास मदत होणार आहे.