Uncategorized

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंड्या’ नाणीजधामकडे होत आहेत रवाना; कोल्हापूर जिल्ह्यात चार दिंड्यांचे होणार स्वागत

out of 10

कोल्हापूर : पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या ‘वसुंधरा पायी दिंडी २०२६’ या उपक्रमांतर्गत विविध उपपीठांतून हजारो वारकरी श्रीक्षेत्र नाणीजधामच्या दिशेने पायी मार्गस्थ झाले आहेत. या दिंड्यांचा समारोप बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीक्षेत्र नाणीजधाम, जि. रत्नागिरी येथे होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या दिंड्यांचे चार ठिकाणी आगमन होणार असून, जिल्हा सेवा समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. दि. १५ ऑक्टोबर रोजी तेलंगणा उपपीठाच्या दिंडीचे जयसिंगपूर, ता. शिरोळ येथे, दि. १६ ऑक्टोबर रोजी मराठवाडा उपपीठाच्या दिंडीचे सरूड, ता. शाहूवाडी येथे, दि. १७ ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भ उपपीठ नागपूरच्या दिंडीचे तुरुकवाडी, ता. शाहूवाडी येथे, तर दि. १८ ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्र उपपीठ नाशिकच्या दिंडीचे तुरुकवाडी येथे आगमन होणार आहे. या चारही ठिकाणी दिंड्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा सेवा समितीच्या वतीने देण्यात आली.

पूर्व विदर्भ उपपीठ नागपूर, उत्तर महाराष्ट्र उपपीठ नाशिक, तेलंगणा उपपीठ, मराठवाडा उपपीठ, गोवा उपपीठ, मुंबई उपपीठ वसई आणि पश्चिम महाराष्ट्र उपपीठ पुणे, तसेच रामानंद संप्रदायाचे मुख्यपीठ असलेल्या श्रीक्षेत्र नाणीजधाम येथून या उपक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध भागांतील हजारो वारकरी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून नाणीजधाम येथे दाखल होणार आहेत. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचा ६० वा वाढदिवस दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध ठिकाणांहून निघालेल्या वसुंधरा पायी दिंड्या नाणीजधाम येथे एकत्र येणार असून, या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सेवेचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यात येत आहे.

सध्याच्या काळातील गंभीर जागतिक समस्यांपैकी एक असलेल्या तापमानवाढीकडे समाजाचे लक्ष वेधणे, वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि स्वच्छतेची सवय समाजात रुजविणे हा वसुंधरा पायी दिंडीचा प्रमुख उद्देश आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ जनजागृतीपुरता मर्यादित न ठेवता दिंडीच्या संपूर्ण व्यवस्थापनातून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हजारो वारकऱ्यांच्या भोजन, निवास, स्नान, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची व्यवस्था करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जात आहे. दिंडीच्या मार्गावर कचरा साचू नये यासाठी स्वतंत्र स्वच्छता सेवेकरी पथक कार्यरत आहे. तसेच स्वच्छतेसाठी स्वतंत्र टॉयलेट व्हॅन आणि पिण्याचे पाणी व इतर आवश्यक वापरासाठी दोन स्वतंत्र पाण्याचे टँकर दिंडीसोबत ठेवण्यात आले आहेत. वसुंधरा संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यासाठी दिंडीच्या प्रवासादरम्यान दररोज वृक्षारोपण करण्यात येत आहे. दिंडी पुढे गेल्यानंतर संबंधित परिसरात कचरा किंवा अस्वच्छता राहणार नाही, यासाठीही विशेष खबरदारी घेतली जात आहे.

वसुंधरा पायी दिंडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिची शिस्तबद्ध वाटचाल. रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी वारकरी रस्त्याच्या एका बाजूने रांगेतून, एकाच तालात आणि लयीत सांप्रदायिक गजर करीत मार्गक्रमण करत आहेत. वारकऱ्यांची विशिष्ट रंगसंगतीतील वेशभूषा दिंडीचे आकर्षण वाढवत आहे. गर्दीच्या परिसरातून प्रवास करतानाही जागतिक तापमानवाढ, वृक्षसंवर्धन आणि स्वच्छतेविषयी जनजागृती केली जात आहे. या उपक्रमाचे हे सलग चौथे वर्ष असून, पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची संस्थानाची भूमिका यातून अधोरेखित होत आहे. दिंडीत सहभागी वारकऱ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. यात्रेकरूंना वेळेवर सकस आहार उपलब्ध करून दिला जात असून, दिंडीसोबत संस्थानाची रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक कार्यरत आहे. युवा-युवती, महिला-पुरुष, ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटांतील आणि समाजातील सर्व स्तरांतील भाविक या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

दिंडीतील वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येत आहे. प्रत्येक सहभागी यात्रेकरूची दिवसातून पाच वेळा विशेष ॲप आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून उपस्थिती नोंदविली जात आहे. त्यामुळे यात्रेकरूंची उपस्थिती आणि आवश्यक माहिती व्यवस्थापनाला नियमितपणे उपलब्ध होत असून, संपूर्ण दिंडीवर प्रभावीपणे लक्ष ठेवणे शक्य होत आहे. अध्यात्म, मानवसेवा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधण्याच्या उद्देशाने जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या हस्ते नुकतेच ‘ब्लड इन नीड’ या अभिनव ॲपचे लोकार्पण करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून एखाद्या रुग्णाला विशिष्ट रक्तगटाची तातडीने आवश्यकता भासल्यास संबंधित भौगोलिक क्षेत्रातील त्याच रक्तगटाच्या इच्छुक रक्तदात्यांशी अल्पावधीत संपर्क साधता येणार आहे. यामुळे गरजू रुग्ण आणि रक्तदाता यांच्यात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने थेट संपर्क निर्माण करण्यास मदत होणार आहे. ‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’ या जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या मानवतावादी शिकवणीनुसार रामानंद संप्रदाय विविध सेवाभावी उपक्रम राबवत आहे.

संप्रदायाच्या अलीकडे राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण अभियानांतर्गत अवघ्या १५ दिवसांत देशभरात सहा लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. यापूर्वी जानेवारी महिन्यात दोन आठवड्यांच्या कालावधीत आयोजित रक्तदान अभियानातून दोन लाखांहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करून त्या देशातील महत्त्वाच्या रक्तपेढ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या. मरणोत्तर देहदानासाठी संप्रदायातील ५६ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी संकल्पपत्रे भरली आहेत. आतापर्यंत २४३ हून अधिक देह वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी वैद्यकीय महाविद्यालयांना दान करण्यात आले आहेत. मरणोत्तर अवयवदानाच्या माध्यमातूनही गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य केले जात आहे.

सनातन संस्कृतीचे जतन करतानाच आधुनिक आणि समाजाभिमुख विचार स्वीकारणे, हे जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या कार्याचे वैशिष्ट्य मानले जाते. समाजातील सर्व स्तरांतील मुलांसाठी वेदपठणाच्या क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच मुलींनाही वेदाध्ययनाची संधी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील शिक्षण संकुलाच्या माध्यमातून गरीब आणि शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून सीबीएसई अभ्यासक्रमाचे मोफत शिक्षण दिले जात आहे. याशिवाय महाराष्ट्रातील विविध महामार्गांवर ५३ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना मोफत आपत्कालीन सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. कच्चे बंधारे उभारणे, शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करणे आणि आधुनिक शेती अवजारांचे वितरण करणे अशा उपक्रमांतून ग्रामीण भागाचा विकास आणि शेतकरी वर्गाच्या सक्षमीकरणासाठीही कार्य केले जात आहे.

अध्यात्म केवळ वैयक्तिक साधनेपुरते मर्यादित न ठेवता पर्यावरण संरक्षण, मानवसेवा, शिक्षण, आरोग्य, रक्तदान, देहदान, अवयवदान आणि शेतकरी सक्षमीकरणाशी जोडण्याचा प्रयत्न रामानंद संप्रदायाच्या विविध उपक्रमांतून सातत्याने केला जात आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचविणारी ‘वसुंधरा पायी दिंडी २०२६’ ही या सेवाभावी वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण मोहीम ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात चार ठिकाणी दाखल होणाऱ्या या दिंड्यांचे स्वागत करण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *