

कोल्हापूर: कोल्हापूर शहरात आज रामानंद संप्रदायाच्या वसुंधरा पायी दिंडीचे करवीर तालुक्याच्या वतीने जल्लोषात स्वागत दिनांक २७ सप्टेंबर २०२५, तेलंगणा येथील श्रीक्षेत्र उपपीठ तेलंगणा, कामारेड्डी, तेलंगणा राज्य येथे वसलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी स्थापित रामानंद संप्रदाय, तेलंगणा उपपीठाहून पायी दिंडीचे प्रस्थान २७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेले आहे. या पायी दिंडी मध्ये हजारो भाविक तेलंगणा पासून श्रीक्षेत्र नाणीजधाम (रत्नागिरी) पर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या २१ ऑक्टोबर २०२५ रोजी ५९ वा वाढदिवस येत आहे. रामानंद संप्रदायाचे मुख्यपीठ नाणीजधाम येथे हा उत्सव या दिवशी अनेक वर्ष साजरा केला जातो. त्यादिवशी हि दिंडी नाणीजधाम येथे दाखल होणार आहे.
तेलंगणा उपपीठ सोबतच पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र (नाशिक) उपपीठ, मराठवाडा (परभणी) उपपीठ, मुंबई उपपीठ (वसई), पश्चिम महाराष्ट्र (पुणे) व गोवा या ७ उपपिठाहून देखील अश्याच प्रकारे पायी दिंड्या निघणार आहेत. या दिंडीला वसुंधरा पायी दिंडी असे नाव देण्यात आले आहे.
या दिंडीतून, सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे. यावर केवळ संदेशच न देता त्यांच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हजारो लोकांची खाण्या पिण्याची, राहण्याची, मलमूत्र विसर्जनाची, अंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही याची काळजी आयोजकांकडून घेतली जात आहे. मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरींचे पथक या दिंडीत सामील आहे. सोबत टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहे, तसेच सोबत पिण्याचे पाणी, आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन २ स्वतंत्र टँकर्स देखील दिंडी सोबत कायम सज्ज आहेत. त्याचसोबत या दिंडीच्या माध्यमातून दरदिवशी वृक्षारोपण देखील केले जात आहे.
विशेष म्हणजे हि दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने, एका रांगेत, एका तालात आणि लयीत, त्यांच्या सांप्रदायिक गजरावर चालत पुढे सरकत आहे. त्यांच्या वेशभूषा सुद्धा एका रंगसंगती मध्येच आहेत. एका तालावर चालताना वर्दळीच्या भागात हि दिंडी ग्लोबल वॉर्मिंगवर संदेश देताना आढळून आली. अश्याप्रकारे वसुंधरा पायी दिंडीचे हे सलग तिसरे वर्ष आहे आणि तेही नवीन २ दिंडींसह, जी एक वाखाणण्याजोगी बाब आहे. यातून संस्थानाचा एक चांगला उपक्रमच नाही तर त्यांचे सातत्य आणि चिकाटीहि दिसून येते.
या दिंडीमध्ये सहभागी भाविकांची सुद्धा विशेष काळजी घेतली जात आहे असे आढळून आले, कारण वेळच्या वेळी सकस आहार पुरवला जात आहे, सोबत दिंडीमध्ये संस्थानाची एक ऍम्ब्युलन्स चालताना आढळून आली. ज्यात एक वैद्यकीय पथकहि सेवा देताना दिसून आले आहे. अशी हि आगळीवेगळी पायी दिंडी ज्यात फक्त मध्यमवयीनच नाही तर युवा-युवती, महिला-पुरुष असे सर्व वयोगटाचे आणि सर्व सामाजिक वर्गातले भाविक दिसून आले.
जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले जात आहेत, जसे महामार्गावरील ऍम्ब्युलन्स सेवा, मरणोत्तर देहदान, मरणोत्तर अवयव दान, गरीब मुलांसाठी मोफत CBSE बोर्डचे शिक्षण, सर्व जातीपंथांच्या मुला-मुलींसाठी मोफत वेदपाठशाळा, रक्तदान, व्यसनमुक्ती, आपत्कालीन सेवा, दुर्बल घटक पुनर्वसन या आणि अश्या अनेक उपक्रमांसाठी रामानंद संप्रदाय नेहमीच ओळखले गेला आहे. त्यांच्या या विविध समाजहितोपयोगी उपक्रमासाठी देखील समाजात विविध स्तरांवर यांचे कौतुक होत आहे.
यासोबत दुग्धशर्करा योग म्हणजे हल्लीच घोषित करण्यात आलेली सरकारी योजना ‘एक पेड माँ के नाम’, जी या सलग ३ वर्षे सुरू असलेल्या वसुंधरा पायी दिंडीच्या पर्यावरणसंरक्षणाच्या प्रयत्नांना जोड देते. म्हणूनच विशेष कौतुकाची बाब म्हणजे आता रामानंद संप्रदायाने सरकारच्या या योजनेत सुद्धा हिरीरीने आणि सक्रिय सहभाग घेतला आहे. या दिंडींदरम्यान शेकडोंच्या संख्येने वृक्ष लागवड करण्याचा मानस पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून करण्यात आला आहे.