लातूर: येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विधी महाविद्यालयामध्ये ‘स्पोर्ट्स लॉ अॅज अ करिअर अपॉर्च्युनिटी फॉर लॉ स्टुडंट्स: टर्निंग पॅशन इनटू प्रोफेशन’ या विषयावर ख्राईस्ट युनिव्हर्सिटी, लवासा येथील प्रख्यात कायदेतज्ञ डॉ. संजय बंग यांचे अत्यंत उद्बोधक व्याख्यान संपन्न झाले. नुकतीच केंद्र शासनाने नॅशनल स्पोर्ट पॉलीसीला १ जुलै २०२५ रोजी मान्यता दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानाचा मुख्य उद्देश विधी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील कायदेशीर पैलूंमध्ये असलेल्या वाढत्या संधींबद्दल माहिती देणे आणि त्यांना या क्षेत्रातील करिअरच्या शक्यतांबद्दल मार्गदर्शन करणे हा होता.
प्रास्ताविकात प्राचार्या डॉ. पूनम नाथानी यांनी अशा प्रकारच्या उद्बोधक व्याख्यानाची आवश्यकता विशद केली. यासाठी दयानंद शिक्षण संस्थेच्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड. आशिष वाजपेयी यांचे विद्यार्थ्यांच्या हितासाठीचे सतत मार्गदर्शन असते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आजच्या व्याख्यानाचे आयोजन केले यावर त्यांनी विशेष भर दिला.
या व्याख्यानात डॉ. बंग यांनी क्रीडा कायद्याची वाढती व्याप्ती आणि या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींवर प्रकाश टाकला. जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील वाढत्या व्यावसायिकतेमुळे कायदेशीर समस्यांचे प्रमाणही वाढले आहे. खेळाडूंचे हक्क, डोपिंगविरोधी कायदे, कराराचे वाद, बौद्धिक संपदा हक्क, प्रसारण हक्क, खेळ प्रशासनाचे नियम आणि खेळाडूंच्या नैतिक जबाबदाऱ्या, खेळाडूंचे कल्याण, स्पर्धांचे नियमन, वाद निराकरण आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा कायदे अशा अनेक पैलूंमध्ये कायदेशीर मदतीची गरज असते. अशा परिस्थितीत, क्रीडा कायद्याचे जाणकार असलेले वकील, सल्लागार आणि प्रशासकांची मागणी वाढत असल्याचे डॉ. बंग यांनी नमूद केले.
डॉ. बंग यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा कायद्याच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांबद्दलही माहिती दिली. यामध्ये कराराचे कायदे, आंतरराष्ट्रीय कायदे, मध्यस्थी (Arbitration), तसेच क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक आणि व्यावसायिक बाबींचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की, केवळ कायद्याचे ज्ञान पुरेसे नसून, खेळाची आवड आणि या क्षेत्रातील नवीनतम घडामोडींची माहिती असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
या व्याख्यानाने विधी विद्यार्थ्यांना क्रीडा कायद्याच्या क्षेत्रात असलेल्या उज्ज्वल भविष्याबद्दल एक नवीन दृष्टिकोन दिला आणि अनेकांना त्यांची क्रीडा क्षेत्रातील आवड एका व्यावसायिक संधीमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रेरणा दिली. हे व्याख्यान विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले, कारण त्यांना एक अपारंपरिक परंतु वाढत्या मागणीचे करिअर क्षेत्र म्हणून क्रीडा कायद्याची ओळख झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एल बी पाचव्या वर्षाची विद्यार्थिनी कु.प्रणिता शेंडगे यांनी तर आभार प्रदर्शन बी ए एल बी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु गार्गी बस्तापुरे यांनी केले. यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.