लातूर येथे पत्रकारांसाठी शुक्रवारी कार्यशाळा
लातूर, दि. ३० (जिमाका): माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर शहरातील डॉ. भालचंद्र रक्तपेढी सभागृहात सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होईल.
जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर लातूरचे प्रभारी विभागीय माहिती उपसंचालक विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
या कार्यशाळेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता’ या विषयावर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे मार्गदर्शन करतील, तर ‘वृत्त संकलन आणि संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व’ या विषयावर परभणी येथील मराठी भाषा तज्ज्ञ प्रा. दीपक रंगारी मार्गदर्शन करतील. तसेच, विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक (माहिती) डॉ. श्याम टरके हे अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी याविषयी माहिती देतील. जिल्ह्यातील सर्व पत्रकार, वृत्तपत्र प्रतिनिधी आणि संपादक यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालय यांच्यातर्फे करण्यात आले आहे.